मंत्री म्हणून मी ' पहिल्यांदाच शपथ घेतली आणि केली खात्याचा आढावा घेता-घेता संपूर्ण राज्याचा अभ्यास केला. आमदार म्हणून हा सर्व कारभार जवळून बघतच होते; पण मंत्रिपदाने माझा आवाका वाढवला. मी जो महाराष्ट्र बघतेय, तो अद्भुत आहे.
अनेक समस्यांनी ग्रासलेला असेलही; पण त्या सोडवण्याचं सळसळतं चैतन्यही या महाराष्ट्रात आहे. वैचारिक -
सांस्कृतिक-साहित्यिक-राजकीय-औद्योगिक-सामाजिक असा प्रचंड मोठा वारसा महाराष्ट्राला आहे. इथे विकास फक्त पायाभूत सुविधांचा झाला नाही, माणूस म्हणूनही विकास झाला. माणसाला माणसांसारखं वागवण्याचं शिक्षण देणारी संतपरंपरा ते आजच्या सॉफ्टवेअर क्रांतीपर्यंत सगळीकडे महाराष्ट्राने नेतृत्व केलंय. येणारा काळ भयंकर आहे. खास करून कोरोनानंतरचं जग कसं असेल, याची कल्पनाही करवत नाही. कोरोना संकटामुळे संपूर्ण मानवजातीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.
अशा वेळी या कोरोनावरची लस शोधण्याचं काम महाराष्ट्रात केलं जातंय, ही बाब करायची केवळ अभिमान वाटण्यासारखी नाही, तर आता जगानेही आपल्याकडे नेतृत्व सोपवलंय, ही जाणीव जागृत करण्याची ही वेळ आहे. विविध संशोधनामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. जुगाड - ज्याला इंग्रजीत R&D 'रिसर्च अँड डेव्हलपमेंट' म्हणतात; अशा 'जुगाड'मधून अनेक शोध लागतात. आज महाराष्ट्राने 'आर अँड डी'मध्ये जास्त गुंतवणूक केली पाहिजे. वातावरण बदलामुळे शेतीचं गणित बिघडलंय, कमी पावसात तग धरतील, दबार-तिबार पेरणीचं संकट दूर करेल, अशी बियाणं आपल्या तरुण संशोधकांनी शोधली पाहिजेत.
प्रत्येक संकटाला संधी म्हणून पाहिलं पाहिजे. कोरोनाच्या संकटामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडलीय. रोटी-कपडा-मकान-इंटरनेट या मूलभूत गरजांनंतरही मानवाची भूक मोठी आहे. तो सामाजिक प्राणी आहे. त्याला स्थैर्य लागतं, शिक्षण लागत, मनोरंजन लागतं, जीवनमान लागतं! जागतिक मंदी आणि कोरोनामुळे हे सर्व धोक्यात आलेलं आहे. अशा वेळी एका नव्या जगाची निर्मिती शक्य आहे. हे काम केवळ महिलाच करू शकतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे राज्यातल्या जवळपास ५० टक्के लोकसंख्येला म्हणजेच महिलांना उद्योजकता शिकवली, तर येणारं जग वेगळं असेल... महिलांना स्वयंपूर्ण बनवणं आणि त्यांना नेतृत्व करायला देणं हा माझा अजेंडा असणार आहे. खंत आहे की, महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी एकाही महिलेला मिळालेली नाही. पण, मला विश्वास वाटतो की, साठीतील महाराष्ट्राने आता आव्हान पेललं आहे. आता लवकरच केवळ महाराष्ट्रचंच नाही, जगाचंही नेतृत्व महाराष्ट्रातील महिला करताना दिसतील.
महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी एकाही महिलेला मिळालेली नाही. पण, मला विश्वास वाटतो की, साठीतील महाराष्ट्राने आता आव्हान पेललं आहे. आता लवकरच केवळ महाराष्ट्रचंच नाही, जगाचंही नेतृत्व महाराष्ट्रातील महिला करताना दिसतील.
लेखक :
श्रीमती यशोमती ठाकुर ,
महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य