शेतकऱ्यांनी कापसाच्या वाती करायच्या काय? - माजी कृषीमंत्री डॉ बोंडे
कापूस खरेदी करिता ५ दिवस ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात यावी: डॉ.अनिल बोंडे
अमरावती कापसाकरिता प्रसिद्ध आहे. वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पश्चिम विदर्भात आज ऑनलाईन नोंदणी केलेल्या ८६३८० शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी अद्याप झालेली नाही. या कापसाच्या वाती करून सरकारची आरती करायची काय ? असा प्रश्न माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी केला आहे.
अमरावती विभागामध्ये कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधी सुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २०५०८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला. कोरोनाचे लॉकडाऊन सुरु झाल्या नंतर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सांगण्यात आले. ऑनलाईन नोंदणी १२८२७८ शेतकऱ्यांनी कापसाकरिता केली आणि आज ८६३८० शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये २२२०२, अकोला जिल्ह्यामध्ये १९०१७, वाशिम जिल्ह्यामध्ये ३३५२, यवतमाळ जिल्ह्यामध्ये १५४५३, बुलढाणा जिल्ह्यामध्ये २६३५६ एकूण पश्चिम विदर्भात ८६३८० शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये पडलेला आहे.
अजूनही कापूस खरेदीची गती संथ आहे. अमरावती विभागात उपलब्ध असलेल्या जीनिगची संख्या ९८ आहे. परंतु ग्रेडरची संख्या फक्त ७९ आहे. परंतु त्यामुळे आठवड्यातील ५ दिवस फक्त ७९ केंद्रावर कापूस खरेदी सुरु असते. प्रत्येक केंद्रावर रोज ५० शेतकऱ्यांचा बोलावले जाते. सर्व केंद्रांनी या गतीने काम केल्यास ३१५० शेतकऱ्यांचाच कापूस मोजल्या जातो. ८६ हजार शेतकऱ्याचा कापूस मोजला असता या गतीने किमान १ महिना लागणार आहे. सर्व केंद्रे अव्याहतपणे सुरु असले तरी पावसाळा सुरु होण्यापूर्वी कापूस खरेदी आटोक्यात येणे या गतीने शक्य नाही.
अनेक शेतकऱ्यांची कापसाची ऑनलाईन विक्रीकरिता नोंदणी व्हायची आहे.
त्यांनी ऑनलाईन नोंदणी करिता अजून ५ दिवस देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
बाजारातील सध्या स्थिती अतिशय भीषण आहे. खाजगी व्यापारी कापूस विकत घ्यायला तयार नाही. खाजगी व्यापारी ४००० ते ४१०० रु. चांगल्या कापसाला भाव देतात. शासकीय खरेदी केंद्राने नाकारलेला कापूस फक्त ३००० रु ने विकत घेतल्या जातो. त्यामुळे व्यापाऱ्याला कापूस विकला तर शेतकऱ्याला किमान १५००/-रु प्रती क्विंटल तोटा होतो. त्यामुळे नगदी पैसे देणार कापसाचे पिक पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवाशी आल आहे. मा.शरदचंद्रजी पवार यांनी केंद्र सरकारला साखरेकरिता पकेज मागितले परंतु विदर्भातील कापसाकरिता ते एक शब्द हि बोलले नाही विदर्भ- मराठवाडाचे हेच दुर्दव आहे.
शासनाने ऑनलाईन नोंदणी केलेलेल्या शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवून घरोघरी जावून कापूस सर्वेक्षण केले आहे आणि शासनाच्याच पडताळणी प्रमाणे शेतकऱ्यांच्याच घरात कापूस शिल्लक आहे. हा कापूस म्हणजे आगीच धन आहे. आग लागल्यास शेतकऱ्यांच्या घराची राख रांगोळी होण्याची शक्यता आहे. हा शिल्लक कापूस कावरलेला असल्यामुळे घरात असलेल्या कापसामुळे खाज सुटण्याची शक्यता आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर हा कापूस सरदावला तर कोणीही खरेदी करणार नाही. खरीप तोंडावर आलेला आहे. आणि कापसाची विक्री न झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे आले नाही त्यामुळे खरीपाचा हंगाम पैशाशिवाय कसा करायचा ? हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.
शासनाने पूर्ण गतीने व क्षमतेने कापूस खरेदी करावा :
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवायचे असल्यास शासनाने पूर्ण गतीने व क्षमतेने कापूस खरेदी करावी आणि शेतकऱ्याच्या खात्यात तातडीने पैसे जमा करावे. कापूस खरेदी शक्य झाली नाही तर भावांतर योजना लागू करण्यात यावी. प्रती हेक्टर २५ क्विंटल प्रमाण धरून १५०० प्रती क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना भावांतराची रक्कम देण्यात यावी. अनेक शेतकऱ्यांची कापूस विक्री ऑनलाईन नोंदणी राहिलेली असल्यामुळे ५ दिवसाची मुदत वाढ देण्यात यावी. आणि या शेतकऱ्यांना हि कापूस खरेदी किंवा भावांतर योजनेमध्ये सामावून घेण्यात यावे.
पश्चिम विदर्भ – मराठवाडा-खानदेशातील पांढर सोन शेतकऱ्याच भवितव्य ठरवत. साखर उद्योगाकडे अतिशय ममत्वानी व प्रेमानी कार्य करणाऱ्या सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सावत्रपणाची वागणूक न देता, तातडीने कामाला लागावे अन्यथा या कापसाच्या वाती करून या सरकारची आरती करावी लागेल असेही यावेळी डॉ बोंडे यांनी म्हटले आहे.