जिल्ह्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत; यापूर्वीची स्थिती कायम



जिल्ह्यात लॉकडाऊन 31 मेपर्यंत;  यापूर्वीची स्थिती कायम
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 17 : शासनाकडून लॉकडाऊनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढविण्यात आला असून, यापूर्वी दिलेले संबंधित सर्व आदेश लागू राहतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.

याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज जारी केला. त्यानुसार क्लस्टर व कंटेनमेंट झोनसाठीचे सर्व आदेश लागू राहतील. तेथील निवासी नागरिकांना आरोग्यसेतू ॲपद्वारे व विविध उपायांद्वारे 100 टक्के संरक्षण मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्याधिका-यांना देण्यात आले आहेत.

65 वर्षे व त्याहून अधिक वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती, 10 वर्षाखालील मुले यांनी आवश्यक किंवा आरोग्यविषयक कारणांशिवाय बाहेर पडू नये. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारची कटिंग, सलून, स्पा आदी दुकाने बंद राहतील.

आदेशानुसार, मागील पारित केलेल्या संचारबंदीच्या आदेशातील मुद्दे व सूचना तशाच कायम ठेवण्यात आल्या आहेत. अमरावती शहर व अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, साप्ताहिक बाजार, जनावरांचे बाजार, उत्सव, जत्रा आदी बंद राहील.   

 जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या सेवा सकाळी 7 ते दुपारी 3 सुरु राहतील. रूग्णालये व औषधालये पूर्णवेळ सुरू राहतील. शासकीय, खासगी, सार्वजनिक क्षेत्र कार्यालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना आरोग्य सेतू हे ॲप वापरणे बंधनकारक करावे. याबाबतची जबाबदारी कार्यालयप्रमुखाची असेल. शासकीय, खासगी, सार्वजनिक क्षेत्र कार्यालयात आठवड्यातून एकदा संपूर्ण निर्जंतुकीकरण करावे, असेही निर्देश आहेत.
Previous Post Next Post