पोकरा चा प्रलंबित निधी 15 दिवसांत होणार शेतक-यांच्या खात्यात जमा होणार

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

‘पोकरा’चा प्रलंबित निधी 15 दिवसांत होणार शेतक-यांच्या खात्यात जमा

अमरावती, दि. 19 : ‘पोकरा’अंतर्गत जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांच्या अनुदानाचा सुमारे 1 कोटी 62 लाख रूपयांचा प्रलंबित निधी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने प्राप्त झाला असून, अनुदानाची रक्कम येत्या 15 दिवसांत संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.    

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सुमारे 919 लाभार्थी शेतकरी बांधवांचे अनुदान प्रलंबित राहिले होते.  ते मिळावे यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन दिले व पाठपुरावा केला. पोकरा योजनेत जिल्ह्यातील निवडलेल्या गावांतील लाभार्थी शेतक-यांमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे लाभार्थी शेतक-यांच्या रक्कम खात्यात जमा करण्यात आलेली नाही. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती पाहता शेतकरी हा आर्थिक अडचणीत आलेला आहे. तसेच पुढे खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे आवश्यक आहे, असे त्यांनी कृषी मंत्री श्री. भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले.

जिल्ह्यात पोकराअंतर्गत ठिबक सिंचन, पीव्हीसी पाईप, फळबाग लागवड, बीजोत्पादन कार्यक्रम, शेळीपालन, तुषार सिंचन, विद्युत पंप, रेशीम लागवड आदी कामे करणा-या 919 लाभार्थ्यांचा निधी प्रलंबित होता. ही बाब पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तत्काळ कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच याबाबत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाने शासन निर्णय जारी केला. त्यामुळे जिल्ह्यात निधी प्राप्त झाला असून, संबंधित शेतकरी बांधवांची अडचण दूर होणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांत एकूण 532 गावांमध्ये नानाजी देशमुख प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

 पोकरा योजनेचा हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याचा हेतू असल्याने दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. प्रकल्पात राबवावयाच्या कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Previous Post Next Post