माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुख्यमंत्र्यांनी दिली राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त शपथ
![]() |
Oath on the occasion of National Unity Day |
मुंबई: माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयात माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ व माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दिवस निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची शपथ उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना यावेळी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्याक विकास, पणन मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषिमंत्री धनंजय मुंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, यांनीही इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी मंत्रालयातील प्रधान सचिव, सचिव, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यपाल - उपमुख्यमंत्री यांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
राज्यपालांनी दिली राष्ट्रीय एकतेची शपथ
मुंबई: देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील उभयतांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.