रब्बीसाठी संयुक्त खते वापरा- कृषी विभागाची सूचना
अमरावती, दि. 11 : रब्बी हंगामासाठी डीएपी रासायनिक खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तथापि, रासायनिक खत पुरवठादारांकडून या खताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने उपलब्धता कमी आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होतच आहेत. तथापि, सद्य:स्थितीत शेतकरी बांधवांनी डीएपीला संयुक्त पर्यायी खते वापरावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी गोपाळराव तुरेराव देशमुख यांनी केले आहे.
रब्बी हंगामासाठी हरभरा व गहू पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांची लगबग सुरू असून, त्यासाठी बियाणे व रासायनिक खतांची खरेदीही होत आहे. शेतकरी बांधवांकडून डीएपी या रासायनिक खतांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
रब्बी हंगामासाठी जिल्ह्याला 28 हजार 330 मेट्रिक टन युरिया, 12 हजार 720 मे. टन डीएपी, 6 हजार 80 मे. टन एमओपी, 21 हजार 590 मे. टन संयुक्त खते, 25 हजार 220 मे. टन एसएसपी असे एकूण 93 हजार 940 मे. टन खते कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे. तथापि, सद्य:स्थितीत 5 हजार 417 मे. टन युरिया, 22 मे. टन डीएपी, 446 मे. टन एमओपी, 2 हजार 325 मे. टन संयुक्त खते, 2 हजार 444 मे. टन एसएसपी व 230 मे. टन इतर खते असा एकूण 23 हजार 400 टन रासायनिक खताचा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
डीएपी खताचा पुरवठा पुरेशा नसल्याने संयुक्त खतांचा पर्याय वापरावा. पिकाला शिफारशीप्रमाणे खताची मात्रा संयुक्त खतातून पूर्ण करता येते. डीएपीला पर्यायी संयुक्त खते जसे 10:26:26, 12:32:16, 20:20:00:13, 15:15:15 व एसएसपी या खतांची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे शेतक-यांनी संयुक्त खतांचा वापर करण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.
