धान शेतीमध्ये पर्यावरण पूरक स्मार्ट कृषि तंत्राचा अवलंब आवश्यक’ - डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ

‘धान शेतीमध्ये पर्यावरण पूरक स्मार्ट कृषि तंत्राचा अवलंब आवश्यक’  
- डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशनच्या ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्यांशी थेट संवाद 


गोंदिया, दि. ५/०६/२०२१: जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत हरितवायूंपैकी मिथेन वायूचे उत्सर्जन पारंपारिक चिखलणी पद्धतीने लागवड केलेल्या धान शेतीतून होत असल्यामुळे ते कमी करण्यासाठी धान शेतीमध्ये पर्यावरण पूरक स्मार्ट कृषि तंत्राचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाच्या मृद विज्ञान आणि कृषि रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे मृद शास्त्रज्ञ  डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ यांनी केले. पर्यावरण पूरक स्मार्ट कृषि तंत्रामध्ये हरित वायूंचे उत्सर्जन ४० ते ४५ टक्क्यांनी कमी होऊन शारीरिक श्रम कमी करणे, उत्पादन आणि नफ्यात ३० ते  ५० टक्क्याने वाढ होणे तसेच शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्याची काळजी घेतली जाते असेही ते म्हणाले. त्यासाठी धानाच्या चांगल्या वाणाची निवड, पाण्याची बचत करणारे तंत्र, यंत्रांचा वापर, पीक पद्धतीमध्ये बदल, आणि सेंद्रीय तसेच संवर्धित शेती, गट शेती इत्यादी तत्त्वांचा धान शेतीमध्ये अंतर्भाव केल्यास पर्यावरणाचे संरक्षण साधून सामाजिक प्रगती साधता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. 

कोविड-१९ च्या कठीण स्थितीत कृषि विद्यापीठाचे शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कडू यांचे मार्गदर्शनात मृद विज्ञान आणि कृषि रसायनशास्त्र विभाग, डॉ. पं.दे. कृ. वि., अकोला आणि रिलायन्स फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ‘धानशेतीचा हवामान बदलावर होणारा परिणाम आणि पर्यावरण पूरक स्मार्ट शेती तंत्राचा वापर’ या विषयावर दि. दि. ५ जून २०२१ रोजी गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित ऑडीओ कॉन्फरन्स कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. कंकाळ बोलत होते. यासाठी रोवणी न करता डायरेक पॅडी सीडरने धानाची पेरणी, पीकेव्ही श्री पद्धतीने लागवड, तूस-तणीस आणि कोंडा यांचा पुनर्वापर- गिरीपुष्पाचा पाला बांधीत गाडणे- युरिया – डीएपी ब्रीकेटचा वापर  तसेच ओळीत लागवड या  चार सूत्री पद्धतीने लागवड, अॅझोला आणि नील-हरित शेवाळ यांचा बांधीमध्ये वापर,  शेत आलटून पालटून ओले व कोरडे ठेवणे, धानानंतर कडधान्ये, तेलबिया पिके, भाजीपाला पिके, फळझाडे इत्यादींचा अंतर्भाव या स्मार्ट शेती तंत्रामध्ये कसा करावा याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कीड व रोग व्यवस्थापनात जैविक आणि सेंद्रीय घटकांचा वापर करून, एकात्मिक शेती पद्धतीच्या फळबाग, भाजीपाला, चारा पिके, पशुपालन मत्स्यपालन इत्यादी घटकांचा शेतीमध्ये अंतर्भाव करून जोखिम कमी करता येते असे शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना असे आवाहन त्यांनी सांगितले. 
कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि गोंदिया या चार तालुक्यातील विविध गावांमधून ४२ शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून प्रश्न विचारले. शेतकऱ्यांच्या वतीने टेमणी  गावचे अंकुश कटरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि संचालन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी धम्मदीप गोंडाणे यांनी केले.
Previous Post Next Post