‘रिलायन्स फाऊंडेशनच्या डायल आउट कॉन्फरन्स कार्यक्रमात सहभागी होवून पाच एकर कापशीत झाला ६० हजारांचा फायदा’
भानुदास भाऊराव डवरे (३५) हे ग्राम सोनारली, ता. कोरपणा, जिल्हा चंद्रपूर येथील अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचेकडे पाच एकर शेती आहे. ते पारंपारिक पद्धतीने कपाशीचे पीक घेतात. सन २०२० च्या खरीप हंगामात त्यांच्या संपूर्ण पाच एकरातील कपाशीवर बोंडअळी आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झाला होता. ह्या दोन्ही किडी कपाशीला अत्यंत घातक असल्याने संपूर्ण पीक नष्ट होते की काय या भीतीने ते चिंताग्रस्त झाले होते. अशा स्थितीत रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवेच्या डायल आउट कॉन्फरन्स कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि तज्ज्ञांना त्यांच्या समस्येवर उपाययोजना विचारली. यावर कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर येथील कृषि विशेषज्ञ यांनी बोंडअळीने नुकतीच प्रादुर्भाव ग्रस्त झालेली बोंडे तोडून जाळून टाकण्याचा व त्यानंतर निंबोळी अर्काच्या दर १५ दिवसांनी २ ते ३ फवारण्या करण्याचा सल्ला दिला. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनाकरिता फ्लोनिकामिड ५० टक्के दाणेदार या कीटकनाशकाची एकरी ६० ग्राम या प्रमाणात फवारणी करण्याबाबत अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार भानुदासने निंबोळी अर्क आणि फ्लोनिकामिड ५० टक्के विद्राव्य दाणेदार या कीटकनाशकांच्या योग्य वेळी फवारण्या केल्या. याला केवळ ४००० रुपये एवढा खर्च आला. त्यानंतर त्याच्या कपाशीवरील बोंडअळी आणि पांढरी माशी या दोन्ही किडींचा पूर्णपणे बंदोबस्त झाला व परिणामी त्याला ५० क्विंटल कापूस झाला व तो रु. ५८२५ प्रती क्विंटल या भावाने विकला. मागील वर्षी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे भानुदासने ६ ते ७ हजार रुपये खर्च करूनसुद्धा बोंडअळीचे योग्य नियंत्रण झाले नव्हते; कपाशीचे उत्पादनही तुलनेने कमी म्हणजे एकूण ४० क्विंटल एवढेच झाले होते. ऐन कोरोना महामारीच्या बिकट कालावधीत रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सहजतेने आणि मोफत मिळालेल्या शेती सल्ल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत भानुदासला उत्पादनात झालेल्या वाढीपोटी रु. ५८,००० आणि वाचलेल्या खर्चाचे रु. २,००० असा एकूण रु. ६०,०००/- चा फायदा झाला.
“माझ्या कपाशीच्या पिकावर नुकताच बोंडअळी आणि पांढरी माशी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव सुरु झाला होता. यापूर्वी झालेल्या नुकसानामुळे या वर्षीदेखील तीच परिस्थिती होते की काय अशी भीती मनात होती. परंतु, रिलायन्स फाऊंडेशनच्या डायल आउट कॉन्फरन्स कार्यक्रमात सहभागी झाल्यावर मला थेट कृषि शास्त्रज्ञांकडून त्वरित आणि सोप्या व समजेल अशा भाषेत सल्ला मिळाला. त्यामुळे मी अगदी वेळेत उपाययोजना करु शकलो आणि माझे कपाशीचे संपूर्ण पीक चांगले होवून त्यापासून मला सुमारे ६०,००० रु चा फायदा झाला.” - भानुदास भाऊराव डवरे, ग्राम सोनारली (मो. क्र. ७६२००६९३३०).