अमरावती, दि. 16 : कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात आज सकाळी अकराच्या दरम्यान शुभारंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्ह्यात अमरावती येथे जिल्हा रुग्णालय व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच केंद्रांवर लसीकरणाचा शुभारंभ झाला. प्रत्येकी 100 लाभार्थ्यांप्रमाणे 500 लाभार्थ्यांची शुभारंभाच्या दिवशी लसीकरणासाठी निवड करण्यात आली. याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातीला कोविशिल्ड लसींचा सुमारे 17 हजार डोस प्राप्त झाला. त्यानंतर राज्यात सहा ठिकाणी कोव्हॅक्सिन लसही देण्याचा निर्णय झाला. त्यात पुण्यासह अमरावती जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार कोव्हॅक्सिन लसीचे दोन हजार डोस जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले व तेथील केंद्रात ही लस देण्यात आली.