सण समारंभ साजरे करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी


सण समारंभ साजरे करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

गणेश मंडळ आणि जनतेला मिरवणूका काढता येणार नाहीत.

 वर्धा :  पोळा, जन्माष्टमी, तान्हा पोळा आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्मातील सण येत्या काळात येऊ घातले आहेत. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण साजरे करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. येत्या काळात कोणत्याही सणासाठी मिरवणुका, शोभायात्रा काढता येणार नसून सर्व सण, समारंभ  साधेपणाने, गर्दी होणार नाही याची जाणीव ठेऊन साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.


गणेशोत्सव

प्लॅस्टर ऑफ पॅरीस ऐवजी प्राधान्याने पर्यावरण पुरक ,मातीच्या गणेश मुर्ती वापरण्यात याव्यात. एक गाव एक गणपती, एक मोहल्ला एक गणपती संकल्पना राबविण्यात यावी. गणेशोत्सवासाठी  गणेश मंडळांना नगर पालिका क्षेत्रात नगर पालिका प्रशासन व ग्रामीण भागात संबंधीत ग्रामपंचायत यांची परवानगी घेणे अनिवार्य असेल. श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फुट पर्यंतच मर्यादित राहील. घरगुती गणेश मुर्ती ऑनलाईन पध्दतीने विकत घेण्यास प्राधान्य द्यावे.

गणपती विक्रीकरीता स्थानिक प्राधिकारी यांनी कोवीड-19 संबंधीत शासनाच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन जागा निश्चित करावी. तसेच जागेची आखणी करुन ईश्वरचिठ्ठीने गणपती विक्रीकरीता इच्छुकांना जागा वाटप करावी आणि मुर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावावा.


[ads id="ads1"]

गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूका काढता येणार नाहीत. तसेच विक्री ठिकाणाहून मुर्ती आणणेकरीता सार्वजनिक मंडळांतर्फे जास्तीत जास्त 4 व्यक्ती व घरगुती गणपतीसाठी जास्तीत जास्त 2 व्यक्तींना जाण्याची परवानगी असेल.  सार्वजनिक गणपती मंडळाने कमीत कमी व साधी सजावट करावी. दरवर्षी प्रमाणे मोठा मंडप न टाकता केवळ मुर्ती व सजावट यांचे पावसापासून संरक्षण होईल इतपत आकाराचे मंडप उभारावेत.

गणेशोत्सव मंडळांनी दररोज मंडपाची स्वच्छता करावी कुठल्याही परिस्थितीत नागरिकांना बैठक व्यवस्था करता येणार नाही. दर्शनासाठी भावीक आल्यास थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉशची व्यवस्था करावी तसेच सोशल डिस्टंसींगचे पालन करावे. सार्वजनिक गणपती मंडळातर्फे कुठलेही सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात येऊ नये. त्याऐवजी कोरोना विषयक बॅनर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्य शिबीरे, आरोग्यविषयक कार्यक्रम यांचे आयोजन करावे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, अशासकीयसंस्था, शासकीय कर्मचारी, सफाई कामगार या कोरोना योध्दांचा सन्मान यासारखे कार्यक्रम घेण्यासाठी  सार्वजनिक मंडळांना प्रोत्सहीत करावे.

गणेश विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव यांची जागा निश्चित करणे व या तलावांची निर्मिती करण्याचे काम  नगरपालिका प्रशासन व  ग्रामपंचायत प्रशासनाने करावी.  सार्वजनिक गणपती विसर्जनाकरीता जास्तीत जास्त 4 व्यक्तींना परवानगी असेल. 4 पेक्षा अधिक व्यक्ती,एकत्र येणार नाही, याची खबरदारी संबंधीत मंडळांनी घ्यावी. सार्वजनिक मंडळांच्या मुर्ती विसर्जनाकरीता एकाच वेळी विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाने वेळेचे नियोजन करून द्यावे मंडळांना पूर्व निर्धारीत वेळ द्यावी. गणेश विसर्जनावेळीची आरती शक्यतो घरी, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी करण्यात यावी. गणेश विसर्जन स्थळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने विसर्जन स्थळाकडे जाणारे रस्ते दुरुस्त करावे.विसर्जन स्थळी लाईट व्यवस्था, निर्माल्य टाकण्याकरीता कचरा पेटी यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक नगर पालिका प्रशासन व ग्राम पंचायतीची असेल.

सार्वजनिक गणपती मंडळाने जिल्हा प्रशासनाकडुन वेळोवेळी निर्गमित केलेली कोरोना संबंधीत आदेश व विहीत केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.


जन्माष्टमी

जन्माष्टमी साठी मंदिरात केवळ पुजारी आणि मंदिराचे दोन विश्वस्त यांच्या उपस्थितीत पूजा अर्चा करून साजरा करण्यास परवानगी आहे. जन्माष्टमी साठी नागरिकांनी मंदिरात गर्दी करू नये. मिरवणुका, स्पर्धा, दहिहंडी, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजनावावर बंदी आहे. जन्माष्टमीचा कार्यक्रम साधेपणाने साजरा करावा.


पोळा व तान्हा पोळा

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱयांनी पोळा सण सुद्धा साधेपणाने साजरा करावा. यावर्षी कोणत्याही गावात बैलपोळा भरवण्यात येऊ नये, तथापि शेतकऱ्यांनी त्यांचे बैल सजवून त्यांची पूजा मंदिरात जाऊन करून घ्यावी. मात्र मंदिरात बैल पूजेसाठी गर्दी होणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. त्याचबरोबर जिल्ह्यात तान्हा पोळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावर्षी तान्हा पोळा निमित्त होणाऱ्या बैल सजावट स्पर्धा , मिरवणुका, शोभा यात्रा यावर बंदी आहे.  तसेच कोरोना संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्यामुळे पालकांनी 10 वर्षाच्या आतील मुलांना घराबाहेर घेऊन जाऊ नये. ज्या ठिकाणी  तान्हा पोळा संदर्भात सजावट स्पर्धा घेऊन, शोभायात्रा, मिरवणुका काढण्यात येतात त्या ठिकाणी केवळ धार्मिक विधीसाठी स्थानिक प्रशासनाने परवानगी द्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post