पालकमंत्र्यांकडून पीककर्ज वितरण, कर्जमुक्ती, हरभरा खरेदीचा आढावा


पालकमंत्र्यांकडून पीककर्ज वितरण, कर्जमुक्ती, हरभरा खरेदीचा आढावा  

पीक कर्ज वितरणाला गती द्यावी -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती : खरीपासाठी शेतकरी बांधवांना कर्ज मिळावे यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे अनेक शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. त्याच्या आधार प्रमाणीकरणाचे उर्वरित काम पूर्णत्वास न्यावे. तसेच बँकांकडून कर्जवितरणाच्या कामाला गती द्यावी. शेतकरी बांधवांची अडचण जाणून त्यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करावे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.  

[ads id="ads1"]

जिल्ह्यातील कापूस खरेदी, पीक कर्ज वितरण, कर्जमुक्ती योजना अंमलबजावणी, हरभरा खरेदी, वन हक्क कायदा विविध विषयांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, राज्य पणन महासंघाच्या जिल्हा विपणन अधिकारी कल्पना धोपे, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे विभागीय व्यवस्थापक श्री. देशपांडे, राज्य वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री. टोपे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात अद्यापपर्यंत 646 कोटी रूपये पीक कर्ज वितरण झाल्याचे दिसते. हे प्रमाण उद्दिष्टाच्या केवळ 38 टक्के आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांकडून एकत्रित प्रयत्न होऊन पतपुरवठ्याला गती आणावी. जिल्ह्यात पीक कर्ज वितरण उद्दिष्टानुसार पूर्ण झाले पाहिजे. याबाबत बँकांनी संवेदनशीलता दाखवून काम केले पाहिजे. आवश्यक कागदपत्रांची यादी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.


शेतक-यांना हरभरा विक्रीचे पैसे तत्काळ मिळावेत

हरभरा खरेदीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना तत्काळ पैसे मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. त्या म्हणाल्या, हे पैसे मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत खरेदी झालेला संपूर्ण माल गोदामात ठेवून वखार महामंडळाने तत्काळ त्याच्या पावत्या नाफेडला पाठवाव्यात जेणेकरून पुढची प्रक्रिया होईल व शेतकरी बांधवांना पैसे मिळू शकतील.

कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 11 हजार खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले. उर्वरित कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी. संबंधित खातेदारांपर्यंत त्याबाबत आवश्यक माहिती पोहोचवून प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

Previous Post Next Post