पीक कर्ज उद्दीष्टपूर्ती जुलै अखेर पूर्ण करावी -कृषीमंत्री
पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावे
वर्धा : शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. पेरणी सुरु होण्यापूर्वी ९० टक्के कर्ज वाटप पूर्ण होणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील ७३ टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना बँकांनी आतापर्यंत केवळ २७ टक्के कर्ज वाटप केल्याबाबत कृषी मंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जुलै अखेरपर्यंत पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बँकांना दिलेत.
कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषी मंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते विविध जिल्ह्यातील शेतक-यांशी संवाद साधत आहेत. आज वर्धा जिल्ह्यात भिडी येथील शेतक-यांशी संवाद साधून जिल्हा परिषद सभागृहात त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पीक कर्जाबाबत लीड बँक व्यवस्थापक यांना निर्देश दिलेत. बैठकीला आमदार रणजित कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे इत्यादी उपस्थित होते.
[ads id="ads1"]
पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना ते म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार २७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३४३ कोटी रुपये जमा केले आहेत. शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची पत निर्माण व्हावी आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळावे यासाठी बँकांना पैसे देण्यात आलेले आहेत. हा निधी लॉक डाऊन पूर्वी वितरीत केलेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत बँकांनी किमान या ३८ हजार शेतकऱ्यांच्या पिक कर्ज प्रकरणावर प्रक्रिया करणे अपेक्षित होते असे ते म्हणाले. मात्र बँका शेतकऱ्यांना योग्य प्रतिसाद देत नसतील तर याबाबत कठोर पाऊल उचलण्यात येईल. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी दर दोन दिवसांनी बँकांचा आढावा घ्यावा. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसतील आणि टाळाटाळ करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेत.
कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बँकांनी सुलभ करावी यासाठी शेतकऱ्यांना घरी बसून अर्ज करता येईल असे अँप तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात ५७ हजार ६३७ कर्जदार शेतकऱयांची माहिती अपलोड झाली आहे. त्यापैकी ५० हजार ३१ शेतकऱयांची माहिती तपासली असून हे शेतकरी पात्र ठरले आहेत. उर्वरित ७ हजार ६३२ अर्जावर प्रक्रिया सुरू आहे आणि ३८ हजार २७३ शेतकऱ्यांच्या खात्यात ३४३ कोटी रुपये जमा झाले आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमध्ये निकषात न बसणा-या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही असे कळविण्यात यावे असे श्री भुसे यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, लीड बँक व्यवस्थापक बिरेंद्रकुमार, आत्मा प्रकल्प संचालक विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व महाबीजचे अधिकारी उपस्थित होते.