वीज बिल टप्प्याने भरण्याची देणार सवलत - राज्यमंत्री तनपुरे
वीज देयकासंदर्भात शासन सकारात्मक : वीज बिल संदर्भातील जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून
वर्धा : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद पडले असून सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही. त्यातच अमाप वीजबिलाची भर पडली आहे. नागरिकांच्या वीज बिलासंदर्भातील समस्या जाणून घेऊन लॉकडाऊनच्या काळातील ३ महिन्याचे विज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, तसेच एकरकमी बिल भरणा-यांना २ टक्के सूट देण्यात यावी अशा सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन ,मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिल्यात.
ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विज बिलासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी संदर्भात शिववैभव सभागृह येथे बैठक पार पडली.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री सुरेश वानखेडे, कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, सुरेश देशमुख, सुनील राऊत, वर्धा एम आय डी असोसिएशनचे प्रवीण हिवरे, शेखर शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये उद्योगांना होणाऱ्या वीज पुरवठा आणि येत असलेल्या अडचणी, वीज देयक, स्थानिक मुलांच्या रोजगाराचा प्रश्न, दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षण संदर्भातील प्रश्न व जिल्ह्यातील इतर समस्या बाबत निवेदने सादर करण्यात आली.
[ads id="ads1"]
यावेळी श्री तनपुरे यांनी शेतकऱ्यांना दिवसा स्वस्त दरात वीज मिळावी तसेच सर्वसामान्य ग्राहकाला व समाजातील शेवटच्या माणसाला वीज देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे सांगून कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात मिटर रिडींग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. रीडिंग झाले नसल्यास प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर विज बिल कमी करण्यात येईल. महावितरणने सरासरी वीज बिल पाठवले असले तरी नागरिकांकडून सक्तीने वसुली केलेली नाही. कोणत्याही ग्राहकाकडून सक्तीने वसुली केली जाणार नाही असेही त्यांनी या वेळी उपस्थित नागरिकांना सांगितले.
महावितरणने नागरीकांना वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या व शंकांचे संपूर्ण समाधान करावे.तसेच ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन यावेळी केले. महावितरण ने यासाठी कंट्रोल रूम तयार करून त्याचा टोल फ्री क्रमांक जनतेपर्यंत पोहचवावा आणि लोकांचे समाधान करावे असेही सांगितले. 1 एप्रिल पासून विजदारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकाना विज बिल जास्त दिले असे वाटत असल्यामुळे त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करावे. तसेच प्रत्येक स्लॅबचा योग्य फायदा नागरिकांना वीज बिलात देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अधीक्षक अभियंता यांनी वीजबिल संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी ग्राहक पंचायत घेऊन यामध्ये २ हजार ३०० ग्राहकांच्या समस्या सोडविण्यात आल्यात. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील नागरिकांच्या तक्रारी तिथेच सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती यावेळी दिली.
या लॉक डाऊनच्या काळात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांनी अतिशय चांगले काम केले आहे. या काळात लोक घरी असल्यामुळे घरगुती विजेचा वापर जास्त झाला. तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे वीज वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पुरवठा अनेकदा खंडित झाला. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अतिशय कौशल्याने व काळजीपूर्वक वीज पुरवठा जास्त वेळ खंडित राहणार नाही यासाठी २४ तास काम केले. यासाठी त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.