कोरोनाशी लढा देण्यास स्वास्थ्य दूत सज्ज
हिंदी विश्वविद्यालय परिवारातील अपर्णेश शुक्ल यांनी तयार केला नर्सिंग रोबोट
जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिले नि:शुल्क भेट
वर्धा : कोरोना-19 वैश्विक महामारीपासून बचाव करण्यासाठी महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या कार्यात निरंतरता ठेवत पूर्णत: स्वचालित यंत्र नर्सिंग रोबोट निर्माण करत एक महत्वपूर्ण तकनीक विकसित केली आहे. हे स्वचालित नर्सिंग रोबोट सामाजिक तथा शारीरिक अंतर ठेवून रुग्णाच्या आवश्यकतेची सर्व सामग्री त्याच्यापर्यंत पोहचवू शकते. यंत्राची निर्मिती विश्वविद्यालय परिवारातील सदस्य श्री अपर्णेश शुक्ल यांनी केली आहे. एका साध्या कार्यक्रमात निवासी उप जिल्हाधिकारी श्री सुनील कोरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मड़ावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, डॉ. अनुपम हिवलेकर, विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी एस मिरगे, सहायक कुलसचिव डॉ. राजेश्वर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाला हे नर्सिंग रोबोट नि:शुल्क उपलब्ध करवून देण्यात आले आहे.
13 किलो वजनाचे हे यंत्र 25 किलो वजनावएढी सामग्री रुग्णांपर्यंत पोहचवू शकते. श्री अपर्णेश शुक्ल यांनी हे यंत्र लॉकडाउनच्या काळात विश्वविद्यालयात उपलब्ध असलेल्या स्क्रैप सामग्रीचा उपयोग करुन तयार केले आहे. अत्यंत कमी खर्चात तयार झालेले हे यंत्र कोरोना महामारीने निर्माण झालेल्या संकटात मोठी मदत करणारे ठरणार आहे.
अपर्णेश हे ग्वालियर येथे एमबीए करत असून ते होळीनिमित्त सुटीत कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी आले. याच काळात लॉकडाउन सुरू झाल्याने त्यांना वर्धेतच थांबावे लागले. यंत्र बनविण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली आणि या कामात त्यांना विश्वविद्यालयातील इतर सदस्यांची मदत झाली.
बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात या यंत्राचे प्रात्याक्षित दाखविण्यात आले. निवासी उपजिलाधिकारी श्री सुनील कोरडे यांनी ही एक मोठी उपलब्धी आहे असे म्हटले असून अशा प्रकारचे यंत्र प्राप्त होणारा वर्धा पहिला जिल्हा ठरला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर इलाज करण्यासाठी हे यंत्र खूप उपयोगी सिद्ध होईल, असे ते म्हणाले. रुग्णाजवळ न जाता त्याचा उपचार करणे आणि त्याला आवश्यक ती मदत देण्याकरिता हे यंत्र ख-या अर्थाने ‘स्वास्थ्य दूत’ ठरेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे आणि आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती. यंत्राच्या संदर्भात श्री अपर्णेश शुक्ल यांनी सांगितले की भविष्यात यंत्राला 360 डिग्री कॅमेरा, सेंसर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तु लावून त्याला अधिक अत्याधुनिक बनविले जाईल.