देवा दार उघड


देवा दार उघड 

----------------
संक्षिप्त ■ आज कोरोना सारख्या जागतिक महामारीत देवा तुझ्या ठायी येवून बसलो असतो तर कुत्र्या-मांजरा सारखं मरावं लागलं असतं. पाठीशी तू होतास क्षणिक मान्यही केलं तरी पाठ शाबूत असायला हवी की नाही? तिच शिल्लक राहली नसती तर तू कुठे राहला असता? असे असूनही हा विराट भोळा समाज तुझी आस लावून बसला आहे. संकटकाळी तुझी दारं बंद झाली, हरकत नाही. निदान आता देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तरी तुझ्या तिजोरीचे दार उघड! हजारो वर्षापासून तुझी भक्ती करणारा समाज आज आर्थिक संकटात सापडला आहे. देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा पाच पटीने तुझ्या तिजोरीत लोकांची संपत्ती आहे. त्यांनी दिलेले दान त्यांच्या उपयोगी पडावे हिच आमची प्रार्थना आहे. आता उगीच पाठ फिरवू नको, संधी दडवू नकोस, देवा दार उघड! ■
----------------

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । 
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

          हे भरतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप धारण करतो आणि या विराट लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला अधर्माशी लढण्याचा उपदेश करतात. अर्जूनही विश्वासाने शत्रूशी लढतो आणि अजिंक्य ठरतो. आज कुरुक्षेत्रासारखीच स्थिती या भूलोकांत निर्माण झाली आहे. महाभयंकर विषाणुने पृथ्वीवर थैमान घातले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अर्जुना सारखी लोकं जीवाची पर्वा न करता शत्रुशी पराकाष्ठेने लढत आहे. अतिसूक्ष्म असलेल्या या विषाणुने जगाला चक्क हादरुन सोडले आहे. अशा परिस्थितीत येथील विराट लोकसमूह देवा दार उघड म्हणून विनवणी करीत आहे. परंतु देवांनी दारं बंद केली आहेत. त्यामुळे समाज भयभीत झाला आहे.

          युगायुगात प्रकटणारा देव केव्हातरी धावून येईल अन् रक्षण करेल. या आशेवर समाज प्राणपणाने लढत आहे. लढता लढता हजारो लोकांचे जीव या जैविक युद्धात गेले आहेत. हजारो मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. जग आज पूर्ण लाॅकडाऊन झालं आहे. तुझी लीला अमर्याद आहे. पण तुला आता धर्मग्रंथातून बाहेर पडावं लागेल, शत्रुचा नायनाट करावा लागेल. केवळ उपदेश करुन संकटावर मात करता येणार नाही. दारं बंद करुन शत्रुला परतून सुद्धा लावता येणार नाही. धर्म ग्रंथातील तुझे शौर्य बघून तू मैदान सोडणार्यापैकी निश्चित नाही, यावर आमचा विश्वास आहे. परंतु ही जागतिक महामारी बघून विश्वासाला तडा जात आहे. बोलायला नको पण या विषाणुला तू घाबरला तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.

          अगदी काल परवाची गोष्ट आहे. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असं स्वप्नात येवून तू म्हणालास. खरंतर तेव्हा काही कळलं नाही. पण जाग आल्यावर लक्षात आलं की संकटाला भिऊ नकोस असं काहीसं तुला म्हणायचं होतं! खरंतर संकटाला काय म्हणून घाबरायचं? विजय तर सत्याचाच होणार! सत्य तेवढं जपलं की कुणीच हरवू शकत नाही. तुझ्यावर एवढा विश्वास निश्चितच आहे. कारण तुझ्या कृपेमुळेच आम्हाला जगण्याचं बळ मिळालं! भविष्याच्या दिशाही ठरल्यात. सर्वस्व अर्पण करुन तुलाच धर्मही मानले. परंतु आम्ही मृत्यूच्या दाढेत सापडले असतांना तुझी दारं बंद असणे याचे दुःख वाटते.

          कित्येक वर्षापासून सारखं मनावर कुणीतरी बिंबवत होते की तुझे काही अस्तित्व नाही म्हणून. तू केवळ धर्मग्रंथातच आहे. तुझे शौर्य, वीरता लोकांच्या उपयोगी पडणारी नाहीत. कधी कधी तर मूर्खात सुद्धा गणना व्हायची. विज्ञानाशिवाय कुणी कुणाला वाचवू शकत नाही असं काहीबाही नास्तिकासारखी ती लोकं म्हणायची. पण वेडं मन कधी त्यांना जुमानलं नाही. सारं विसरून तुझ्यासमोर नतमस्तक व्हायला आम्ही विसरलो नाही. पण आज मनात भयंकर काहूर माजलं. सत्याला आम्ही घाबरतांना पाहिलं! तुझी शपथ, सत्याला आज भीतीने ग्रासलेलं पाहीलं! प्रभु रामचंद्राचे नामस्मरण करतांना 'राम नाम सत्य है!' असे अनेकदा आम्ही म्हणालो. 'ईश्वर ही सत्य है!' म्हणत तर कित्येक लोकांची हयात गेली. पण तुझी दारं बंद झाली अन् सत्याला गालबोट लागलं! तुझे स्मरण करुन सुद्धा मृत्यू उंबरठ्यावर उभा आहेस.

          एक तुझं सत्यच होतं जे निसर्गाशी आजवर लढत होतं! तुझ्या बळावर विज्ञानाशी दोन हात करीत होतं. पण विज्ञानाचा अति विराट पसारा पाहून आज तुझ्या नामातलं सत्य सुद्धा घाबरलं! निसर्गाची किमया अगाध आहे हे खरं ठरलंय. जिंकणे हरणे हा नियतीचा खेळ आहे. परंतु ग्रंथात म्हटल्याप्रमाणे तू अंतिम सत्य नाही. यापलिकडे सुद्धा सृष्टीवर सत्य आहे. खरंतर या सत्याला सामोरा जाण्याचं आत्मिक बळ कदाचित तुझ्यात नाही. म्हणून तू दारं बंद केली आहेस. आता पृथ्वीवरचा हा सर्वनाश पाहून मनात निराशेनं खूप मोठ घर केलंय! तुझ्या नामात विश्वास वाटायचा. पण सारं धुळीस मिळालं. तुझ्या सारखा विघ्नहर्ता पाठीशी असल्यानं जग जिंकण्याचं स्वप्न बघत होतो आम्ही. पण आज निसर्गाची अन् विज्ञानाची सरशी झाल्याचे पाहून गर्व सारा गळून पडलाय क्षणात! 

          आधी सुद्धा पृथ्वीवर अनेकदा अशी संकटं आलीत. प्रत्येकदा विज्ञानानेच ती परतून सुद्धा लावली. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी तेव्हा अनेकांचे प्राण वाचविले. जणू त्यांच्या रुपात तूच आहे असं आम्हाला वाटायचं. पण हा सर्व विज्ञानाचा चमत्कार होता. तुलाही हे सर्व तेव्हा कळत होतं. कारण तू सर्वज्ञ आहेस. पण वेळीच तू सर्वांना सजग केले असते अन् विज्ञानाचे सिद्धांत खरे असतात म्हणून सांगितले असते तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती. विज्ञानाला कुणी नाकारले नसते. तिन्ही लोकांत तुझं अस्तित्व नाही, एवढे जरी पटवून दिले असते तर आज या महामारीत तुझी आतुरतेने लोकं वाट पाहात बसले नसते. तुझ्या अतार्कीक सत्य परंपरेला बळी पडले नसते. तुला माहीत होतं की विश्व निर्मिती तुझी नाही. ती निसर्गाची किमया आहे. थोडे आम्हालाही पटवून दिले असते तर निसर्गापासून कुणी असे दुरावले नसते. आता तर मनात संशयाने मोठे घर केले आहे. तुझे पुराणादी ग्रंथ अन् उपदेश उगीच वाटायला लागले आहे. तुझा महिमा गाणार्या सर्व कथाकल्पना अंधश्रद्धेचा भाग वाटू लागला आहेत.

          बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणूनच कदाचित अशा ग्रंथांची होळी केली असावी. चार्वाकापासून तर आजच्या शदर बेडेकरांपर्यंत जगात ईश्वर नाही म्हणून सांगितले. ते निविर्वाद सत्य आहे. या जागतिक महामारीत त्याची प्रचिती येत आहे. अशा तत्त्वज्ञानींचे विचार आम्ही कां नाकारत आलो याचे नवल वाटते. साधी गोष्ट आहे की विश्वाची निर्मिती सुमारे तेरा हजार कोटी वर्षापुर्वीची आहे. अनंत सूर्यापासून हे विश्व निर्माण झाले आहे. मग अवघ्या सात हजार वर्षापूर्वी घडलेल्या महाभारतात तुझ्या विश्व निर्मितीचे दाखले कशासाठी? तुझ्या भक्ती मोह पाशात आम्ही असं अडकलो की विश्वनिर्मिती तुझी आहे असं मानायला लागलो. शब्दप्रामाण्य असे काही मानगुटीवर बसले की खरे खोटे कधी कळलेच नाही.

          राग वाटण्याचे कारण नाही पण अनंत काळापासून शब्दांचा हा खेळ आम्ही बघत आलो आहोत. शब्दप्रामाण्यता आता समाजाच्या मेंदूत पूर्ण भिनल्या गेली आहे. काल प्रभात घरी आला होता. सहजच त्याला आम्ही ब्रह्मांडाचा अर्थ विचारला? भौगोलिक विज्ञानाचा अभ्यासक असल्याने त्यानेही तात्काळ उत्तर दिले. ब्रह्मदेवाने निर्मिलेला गोल म्हणजे ब्रह्मांड! शब्दशः अर्थ सांगून त्याने विश्वगोलाची निर्मिती सुमारे तेरा हजार कोटी वर्षापुर्वीची अन् ब्रह्मदेवाचा काळ अगदी तीन हजार वर्षापूर्वीचा! प्रभातचे हे उत्तर ऐकूण सर्व थक्कच झाले. म्हणजे विश्वाला आम्ही ब्रह्मांड म्हणत होतो ते सुद्धा खोटे निघाले. शब्दांचा मेळ सत्याशी कुठेच जुळत नव्हता. ब्रह्मदेवाचा उल्लेख प्रथम वेदांमध्ये सापडतो. त्याचा काळ साधारणतः तीन हजार वर्षापूर्वीचा आहे. मग तेरा हजार कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेले विश्व, ब्रह्मांड कसे होऊ शकते?

          चारशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराज म्हणतात की, "सत्यासत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥" म्हणजे खरं खोटं काय यावर गांभीर्यानं विचार करून निर्णय घेतला पाहिजे. निर्णयाची खात्री करून घेत काम पूर्ण केले पाहिजे. अनेक लोकांचं काय मत आहे? असा बहुमताचा विचार करत बसू नयेत. ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांकडून माहिती घ्यावी. ज्यांचा त्या कामाशी संबंध नाही, अशा लोकांच्या मतावर आपला निर्णय घेवू नये. विचार करण्याला वेळेची मर्यादा नाही. मात्र कामाला वेळेचं बंधन आहे. वेळ निघून गेल्यावर कुणी तुमचं भलं करू शकत नाही. असा मार्ग दाखवून सुद्धा समाज बहुमताचा कल पाहून सत्यासत्य मानतो. चिकित्सा करीत नाही आणि त्यामुळे अशा भ्रामक गर्तेत स्वतःला हरवून बसतो.

          असंख्य अशा अतार्कीक गोष्टींवर विश्वास ठेवून समाज वर्षानुवर्ष श्रद्धेचे ओझे वाहत आला आहे. आपण विज्ञानयुगात जगतो आहे याचं भान शेवटी प्रत्येकाला असायला पाहिजे. विश्वनिर्मिती झाल्यानंतर साधारणतः पाचशे कोटी वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली. सूर्यापासून पृथ्वी साडेचारशे कोटी वर्षांनी प्राथमिक स्वरुपात निर्माण झाली. तेव्हा कोणता देव किंवा माणूस पृथ्वीवर अस्तित्वात नव्हता. पृथ्वी तर केवळ एक अति उष्ण जळता गोळा होती. थंड जलमय व्हायला तिला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागलीत. त्या सुमारास केव्हा तरी पृथ्वीवर निसर्गतः रासायनिक प्रक्रिया झाली. प्रथमतः अल्गी शेवाळ व नंतर अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू निर्माण झालेत. अशा स्थितीत सृष्टीचा निर्माता कुणी देव कसा असू शकतो? 

          वास्तविक देव शब्दाच्या व्युत्पत्तीचा काळ ॠग्वेदानंतरचा आहे. वैदीक संस्कृतीत प्रथम त्याचा उल्लेख सापडतो. दीवचा उपासक म्हणजे देव! दीव म्हणजे अग्नी, अग्नीमध्ये घृत टाकून आहुती देणारा अन् यज्ञकर्म करणारा मानव म्हणजे देव! वैदीक संस्कृती साधारणतः चार हजार वर्षापूर्वीची आणि सृष्टी निर्मितीचा काळ तेरा हजार कोटी वर्षापुर्वीचा! सृष्टी निर्मिती आणि देवाचा दुरदुरपर्यंत कुठेच काही संदर्भ जुळून येत नाही. त्यामुळे या जीवसृष्टीला देव नाही तर केवळ विज्ञानच तारु शकणार आहे. हे खरे आहे. उगीच देवा तुला याच्या त्याच्या रुपात अन् अवतारात शोधत बसणं आज तरी सोयीचं नाही. बरं झालं की तुझी दारं बंद झालीत. नाही तर मेंदुवर साचलेली धुळ आणखी किती वर्ष साफ करता आली नसती याचा अंदाज नाही.  

        पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर उभी आहे असं तू पुरानादी ग्रंथात म्हणाला, परंतू पृथ्वी विश्वमंडलात असंख्य छोट्या मोठ्या ग्रहतार्यांसह तरंगत आहे. पृथ्वीखाली कोणताही नाग नसून केवळ अवकाश आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सर्व सजीव निर्जीव पृथ्वीवर स्थिर आहेत. सुमारे दोनशे कोटी वर्षे अगोदर पृथ्वीवर प्राथमिक अवस्थेतील छोटे सजीव निर्माण झाले. शेवटच्या चाळीस कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढे सरपटणारे प्राणी, डायनासोर व वनस्पती निर्माण झाल्यात. नंतर सस्तन प्राणी जन्माला आलेत. अलिकडे सव्वाकोटी वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज आॅस्ट्रेलोपिथेक्स हा बिनशेपटीचा माकड, होमो इरेक्ट्स आणि पुढे होमो सॅपियन म्हणजे हुशार मानव उत्क्रांत होत गेला. असा इतिहास आहे.

          सांगण्याचे कारण एवढेच की जीवसृष्टी अन् विश्वाची निर्मिती जर एक नैसर्गिक घटनाक्रम आहे तर मग त्यांच्या निर्मितीचा हा खोटा ढींढोरा कशासाठी? निसर्ग, विज्ञान आणि तंत्रज्ञान या पलिकडे सृष्टीत कुणी काहीही निर्माण केलेले नाही आणि करु सुद्धा शकत नाही. माकडाची ही शेवटची जात गेल्या एक सव्वा कोटी वर्षापासून उत्क्रांत होत आली आहे. पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करणारा आदिमानव आज विज्ञान युगात पोहचला आहे. संशोधकांनी जीवसृष्टीचा आणि उत्क्रांतीचा इतिहास जगासमोर मांडलेला आहे. त्यांच्या पराकाष्ठेला आणि वैज्ञानिक दृष्टीला निश्चितच तोड नाही. विश्वात जर कोणी देव असेल तर तो मानवश्रेष्ठ वैज्ञानिकच आहे. अचाट ज्ञानाचा पसारा त्यांनी जगासमोर मांडला आहे.

          आपल्या पूर्वजांना त्यावेळी ही वैज्ञानिक दृष्टी आणि विश्व संशोधनाची कल्पना आली नसेलच? एक विशिष्ट शक्ती म्हणून त्यांनी ईश्वराची कल्पना केली असावी. मानवी समुहात गटंतटं पडल्यावर भेदाला सुरवात झाली असावी. त्यातूनच पुढे वंश, कर्म, धर्म अशी शक्ले पडली असावी. मग आपापली शक्तीस्थाने त्यांनी निर्माण केली असावी. कारण जगात अस्तित्वात असलेले सगळे मोठे धर्म, गेल्या चार-पाच हजार वर्षांत मनुष्याने आपल्या कल्पनेने स्थापन व विस्तारीत केले आहेत. पूर्वी वादळ, वारा, पाऊस प्रकोप कारणापासून सुरक्षा मिळावी या खातर एखाद्या शक्तिमान नैसर्गिक घटकाची ईश्वर म्हणून कल्पना त्यांनी गाठली असावी. शब्दरुप विकसीत झाल्यावर त्या शक्तिरुपाला ईश्वर व कालपरत्वे देव असे संबोधन्यात आले असावे. परंतु आज लोकांनी त्यालाच उद्योगाचे साधन बनवले आहे. संपूर्ण देश या मोह जालात अडकलेला आहे. कर्मवाद, विज्ञानवाद सोडून समाज दैववादावर विसंबून आहे. त्यामुळेच देवा दार उघड अशी हाकाटी तो करीत आहे. 

          देशातला खूप मोठा समाज नाहक यात गुंतला आहे. ग्रंथरुपात तुझ्या लीला बघून लोकं दैववाद सोडायला तयार नाही. अनंत पिढ्या त्यात गारद झाल्या. देवा तुझ्या दैववादी धोरणांमुळे धर्मवाद निर्माण झाला. त्यातून पुढे आतंकवाद व दहशतवाद जन्माला आलेत. असंख्य तरुणांचे आयुष्य त्यात बरबाद होत आहे. तरी तू पाश सोडायला तयार नाही. तुझ्या नावावर लोकांनी अब्जो रुपयाचे उद्योग थाटले. तुझ्या तिजोरीत लोकांची प्रचंड संपत्ती असून त्यांच्या उपयोगी पडत नाही. कमीत कमी दीन दुबळ्या लोकांना अन् देशाला ती उपयोगी पडावी एवढंच आमचं म्हणणं आहे. समाजातील केवळ एक वर्ग त्यावर मालकी हक्क बजावून उपभोग घेत आहे. खरंतर तुझी दारं नेहमीसाठी बंद झाली तरी काही बिघडणार नाही. उलट लोकसमूह दैववादातून बाहेर पडेल, संपूर्ण समाज विकसीत होईल. 

          आज कोरोना सारख्या जागतिक महामारीत देवा तुझ्या ठायी लोकं येवून बसली असती तर कुत्र्या-मांजरा सारखं त्यांना मरावं लागलं असतं. पाठीशी तू होतास क्षणिक मान्यही केलं तरी पाठ शाबूत असायला हवी की नाही? पाठच शिल्लक राहली नसती तर तू कुठे राहला असता? असे असूनही हा विराट भोळा समाज तुझी आस लावून बसला आहे. संकटकाळी तुझी दारं बंद झालीत मान्य आहे, परंतु निदान आता देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तरी देवा तिजोरीचे दार उघड! हजारो वर्षापासून तुझी भक्ती करणारा समाज आज आर्थिक संकटात सापडला आहे. देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा पाच पटीने तुझ्या तिजोरीत संपत्ती आहे. लोकांनी दिलेले दान त्यांच्या उपयोगी पडावे हिच आमची प्रार्थना आहे. आता उगीच पाठ फिरवू नको, संधी दडवू नकोस, देवा दार उघड..!

लेखक: वीरेंद्र कडू 
Email: virendrakadoo@gmail.com 
मोबाईल क्रमांक: ९४०४२०२७४४
आर्वी जि.वर्धा. 
Previous Post Next Post