
नागरिकांसह प्रशासनाला दिशानिर्देश : दररोज घेताहेत आढावा
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपातकालिन परिस्थितीत आवश्यकता असतानाही जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मुंबई येथे जाणे टाळले आणि जिल्ह्याच्या हितासाठी येथेच राहून नागरिकांची काळजी घेण्याला प्राधान्य दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत असताना पालकमंत्री अहोरात्र प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांकडून निवड करण्यात येत असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यपदी निवड करण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. या शिफारसपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी विदर्भातील काही मंत्री व आमदार मुंबईला रवाना झाले आहेत. यशोमती ठाकूर यांनाही मुंबईला जाणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटात जिल्हा न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि येथेच राहणे पसंत केले. अमरावतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यु झाल्याने पालकमंत्री यशोमती ठाकूर सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जिल्ह्यात या संकटाची व्याप्ती वाढू नये म्हणून यशोमती ठाकूर प्रयत्न करताना दिसत आहेत. आवश्यक ते दिशानिर्देश त्यांच्याकडून प्रशासनाला दिले जात आहेत. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे रोजगार बूडत असल्याने प्रामुख्याने मोलमजूरी करुन चरितार्थ चालविणार्या वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून अशा कुटुंबांपर्यंत अन्न-धान्य व इतर जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्यात येत आहे. त्यावर यशोमती ठाकूर नजर ठेवून आहेत.
जिल्हाभर प्रत्यक्ष दौरा करुन यशोमती ठाकूर यांनी विविध रुग्णालये, निवारा केंद्रे यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या व तेथील परिस्थिती जाणून घेतली. कुणाचीही हेळसांड होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी संबंधिताना दिलेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात आहे. भविष्यात तो वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर यशोमती ठाकूर विशेष लक्ष देताना दिसतात.
आरोग्य विभागाला आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आरोग्य यंत्रणेतील अधिकार्यासोबतच नर्स, वॉर्डबॉय यांच्याशी थेट संपर्क साधून यशोमती ठाकूर यांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.