शेतक-यांना दोन दिवसात नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन – यशोमती ठाकूर
अमरावती – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना आर्थिक मदतीची घोषणा राज्य सरकारने केली होती. मदतीचे पैसे जिल्ह्यांना वर्गही करण्यात आले आहेत. मात्र, महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. येत्या दोन दिवसात शेतक-यांना नुकसानभरपाईचे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ झाला. दुबार-तिबार पेरण्या करूनही अतिवृष्टीमुळे शेतात कुठलेच पीक आले नाही. अशा परिस्थितीतही सोयाबीन उगवलं होतं पण परतीच्या पावसात ते ही हातून गेले. अशा परिस्थितीत राज्य शासनानं शेतक-यांना मदतीची घोषणा केली. त्याचे पैसे जिल्ह्यांना वर्ग केले. मात्र, महसूल कर्मचारी रजेवर असल्याने मदतीचा निधी मागील १५ दिवसांपासून शासकीय तिजोरीत पडून असल्याचा आरोप ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलेला आहे. शेतक-यांना वेळीच पैसे दिले तर त्यांना दिवाळी साजरी करता येईल. संपूर्ण पिक हातून गेल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने त्यांच्या स्तरावर शेतक-यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. येत्या दोन दिवसात शेतक-यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराच ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

