नगराध्यक्षांनी दिल्या सलूनला भेटी व्यावसायिक घेत आहे खबरदारी



नगराध्यक्षांनी दिल्या सलूनला भेटी व्यावसायिक घेत आहे खबरदारी

प्रतिनिधी राजेश सोळंकी : 

आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून वर्धा जिल्ह्यातील सर्व सलून व्यवसाय बंद होते त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक आणि कारागिरांची आर्थिक परिस्थिती खालावली होती तसेच शारीरिक आरोग्य स्वच्छ व चांगले राहावे तसेच प्रत्येक मनुष्याचे आरोग्याचे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असा महत्त्वपूर्ण सलून व्यवसाय सुरू करावा अशी मागणी होती. 

याबाबतीत सकारात्मक विचार करून लॉकडाऊन 4.0 मध्ये मा.जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक व ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेऊन सलून व्यवसाय सुरू करण्यात रीतसर परवानगी दिल्याने व्यवसायिकांना बोलावून नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण , मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, यांनी व्यवसायिकांशी योग्य खबरदारी घेण्याबाबत चर्चा केली होती.

त्यानुसार सलून व्यवसायिक दुकानात योग्य खबरदारी घेत आहे की नाही हे पाहण्यासाठी नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे यांनी अनपेक्षितपणे शहरातील सलूनला भेटी दिल्या. यावेळी डॉ श्यामसुंदर भुतडा, नगरसेवक सुनील बाजपाई, जगन गाठे, संजय थोरात उपस्थित होते. 

बहुतेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर सूचना फलक, हात धुण्यासाठी पाणी व साबण, हँडवॉश,सॅनिटायझर, ग्राहकांची नोंदवही, सोशल डिस्टनसिंग याची खबरदारी घेतलेली आढळली. काही ठिकाणी उणिवा होत्या त्या तातडीने दूर करण्यासाठी सांगण्यात आले. अनेक ठिकाणी सलूनच्या माध्यमातून संक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील नागरिकांनी सलून मध्ये आपला टॉवेल सोबत घेऊन जावा तसेच आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे यांनी केले.

Previous Post Next Post