
20 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नाही, राज्यातील अशाच कोरोना संसर्ग न झालेल्या 20 जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रयत्न सुरु केले आहेत
मुंबई : राज्यभरातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं होत आहे. मात्र, काही जिल्हे असेही आहेत जेथे अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. राज्यातील अशाच कोरोना संसर्ग न झालेल्या 20 जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रयत्न सुरु केले आहेत राज्यातील कोरोना संसर्ग नसलेल्या ठिकाणी उद्योग व्यवसायाला संधी देण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.
सुभाष देसाई म्हणाले, “राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरु करता येतील का हे पाहावं लागेल. 20 जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोना व्हायरसचा काहीही फैलाव नाही. त्या ठिकाणी उद्योगांसाठी काही अटी शिथील करता येतील का याचा विचार केला जात आहे. सरकारची तत्वं पाळून अशा सवलती देता येतील का? ही शक्यता तपासली जात आहे.”
दरम्यान, याआदी देखील सुभाष देसाई यांनी कोरोनाचा कमी संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी कार्ययोजना सादर करणार असल्याचं म्हटलं होतं. राज्यातील कोरोनाची लागण, संक्रमण नाही किंवा कमी आहे अशा जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग कार्ययोजना तयार करत आहे. लवकरच ही कार्ययोजना सादर करण्यात येऊन उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. देसाई यांनी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या 15 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील डिक्कीच्या सदस्यांना संबोधित करताना हे मत व्यक्त केलं होतं.
उद्योजकांची भूमिका काय?
उद्योजकांनी म्हटलं आहे, “प्रामुख्याने उद्योगांना या संकटामुळे खेळत्या भांडवलाची कमतरता, आरबीआयने बँकांना 3 महिने ईएमआय भरण्यास अवधी दिला असला तरी त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक पुन्हा अडचणीत येणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लघु उद्योजक विशेष प्रोत्साहन योजना, स्टँडअप इंडिया योजने अंतर्गत 15 टक्के मार्जिन मनी अनुदान याबाबतही अडचणी आहेत.”
उद्योजकांच्या या तक्रारीनंतर उद्योगमंत्र्यांनी या सर्व विषयांवर सर्व संबंधितांची बैठक बोलाविण्यात येऊन तोडगा काढन्यात येईल, असं आश्वासन दिलेलं आहे. तसेच या संकटावर मात करण्यासाठी राज्याचा उद्योग विभाग लवकरच कृती आराखडा निर्माण करेल व सर्व उद्योजकांच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करेल असंही उद्योगमंत्री देसाई म्हणाले होते.