ती चर्चा मात्र धडा देणारी-सोबत नियमांचे पालन करण्याची गरज सांगणारीही
वर्धा,दि 9 :- मागील काही दिवसांपासून शांत असणारे जिल्हा सामान्य रुगणालाय.. पोलीस आणि ऍबुलन्सच्या सायरनच्या आवाजाने अचानक हादरले... आज कोरोना आयसोलेशन वार्डकडे धावत सुटलेली ही वाहने धडकी भरवणारी ठरली.... डॉक्टर, परिचारीका, वार्ड बॉय सर्वांचीच लगबग काही तरी वेगळं घडत असल्याचा आभास करून देत होती. रूग्णालयातील कर्मचारी डाक्टर अचानक पीईपी पोशाखात डोक्यापासून पायापर्यत झाकून असलेले कोरोनाच्या लढ्यातील आरोग्य सैनिक सज्ज होते.
तेवढयात रूग्णवाहिका हॅुं ….हॅुं सायरन वाजवत आयसोलेशन वार्डच्या दारात दाखल झाली. वार्ड बॅायने लागलीच रूग्णवाहिकेतून स्ट्रेचर काढला. रूग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल असलेल्या एका संशयित व्यक्तीला स्ट्रेचरवरुन रुग्णवाहिकेकडे धावणारे ते डॉक्टर आणि कर्मचारी शंका वाढवत होते.
तेच रुग्णाला रूग्णविाहिकेत ठेवताच रुग्णवाहिकेचे दार बंद होते आणि....पुन्हा सुरू होतो हृदयाचे ठोके वाढवणारा आवाज.... विरळ गर्दी असणाऱ्या रस्त्यावरून धावणारी ही रुग्णवाहिका हॉर्न वाजवत जितक्या वेगाने धावत होती. तितक्याच वेगाने वर्धेकरांच्या नजरेस पडतात हृदयाचे ठोके वाढवणारी ठरली. सेवाग्रामच्या दिशेने निघत
पुढे पुढे सरकत असताना पोलिसाची गाडी रस्ता मोकळा करून देत होती. रूग्णवाहिकेच्या मागे जिल्हा शल्य चिकित्सक यांची गाडी धावत होती. रस्त्यावरील लोक आ वासून वेगाने जाणा-या गाडयांकडे बघत मनात विविध विचार करत होते.
पूर्व सुचना असल्याने अगोदरच सेवाग्रामला प्रशासन सज्ज होते., रूग्णवाहिका पोहचताच तेथील पी ई पी वेशातील डॉक्टरांनी स्ट्रेचरवरील व्यक्तीला काळजीपूर्वक उतरवून कोरोना केअर वार्डात दाखल केले आणि रूग्णावर उपचार सुरू झालेत.
हा सगळा घटनाक्रम ज्यांनी पाहिला ते वर्धेत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याची चर्चा करत होते. आतापर्यत कोरोनामुक्त असणा-या वर्धा जिल्हयात शेवटी रूग्ण आलाच. लोकांनी काळजी घेतली असती तर आज ही परिस्थती आली नसती. अशी चर्चा सुरू झाली. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळात रस्ते निर्मनयुष्य झाले.... जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती कार्यालयामधील फोन खणखणायला लागलेत. प्रत्येक फोन कोरोना रूग्ण सापडला? हे खरे आहे का? याची खातरजामा करणारे होते.
शेवटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांना फोन करून विचारले. त्यांनी जिल्हयात कोरोना बाधित रूग्ण आढळल्यास काय काळजी घ्यायची आणि प्रशासन काय करेल याची रंगीत तालीम करत असल्याचे पुढे आले. यासाठी डॉक्टर आणि कर्मचा-यांची रंगीत तालीम घेण्यासाठीची मॉक ड्रील त्यांना वेगळा अनुभव देणारी ठरली. पण हे कळताच जीव भांडयात पडला.
जिलहयात आतापर्यत एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. तथापि वर्धेच्या आजुबाजुच्या जिल्हयात कोरोना बाधित रूग्ण असल्याने जिल्हयातील नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोर पालन करावे . केवळ जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठीच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.