
महाराष्ट्राची विभागणी रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये, कोणता जिल्हा कोणत्या विभागात?
'रेड झोन'मध्ये असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्राची विभागणी तीन झोनमध्ये करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह आठ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्ह्यांची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये केली आहे. ‘रेड झोन’मध्ये असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन आता सुरुच राहणार असून तिथले निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे.
रेड झोन
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली
ऑरेंज झोन
कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा
ग्रीन झोन
नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी
15 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.
रेड झोनमधील निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यताआहे. तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. अशा जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर काल महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल.
आपण आता कोरोना रुग्ण समोरुन येऊन चाचणी करण्याची वाट पाहत नाही, तर त्यांच्या घरी जाऊन चाचणी घेत आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रात 33 हजार चाचण्या झाल्यात. केवळ मुंबईत 19 हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 1000 रुग्ण आढळले. मात्र, या रुग्णांमध्ये 60 ते 70 टक्के जणांमध्ये सूक्ष्म ते अतिसूक्ष्म लक्षणं आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं.