शेतीमालाचे युरोपातील पॅकेजिंग तंत्र
युरोपमध्ये शेतमालाचे काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी योग्य पद्धतीचे पॅकेजिंग केले जाते.
त्यासाठी विविध पातळीवर संशोधन झाले असून, त्याचा लाभ शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी होतो.
डाळी, मसाल्याचे पदार्थ, हिरव्या व कापलेल्या भाज्या, फळे यासारख्या पदार्थांचे गुणधर्म वेगळे असल्याने पॅकेजिंगदरम्यान घ्यावयाच्या दक्षताही वेगळ्या असतात. काढणीपश्चात शेतीमालांचे पॅकेजिंग करताना विशेष काळजी घ्यावी लागते. युरोपीय देश या बाबत अत्यंत काटेकोर मानले जातात. युरोपामध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञानामध्ये सातत्याने संशोधन केले जात असून, आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
१) डाळी व कडधान्य
अ) सुयोग्य पॅकिंग : मागणीनुसार १०० ग्रॅम ते १० किलो वजनापर्यंतचे माणसांकडून सहज वाहतूक करणे शक्य होईल, असे पॅकिंग डाळी व कडधान्यांसाठी उपयुक्त ठरते. पॅकिंगसाठी वापरलेल्या प्लॅस्टिक फिल्म अथवा पाऊच यांची आतील पदार्थांचे वजन पेलण्याची क्षमता असल्याचे खात्री करावी.
ब) संसर्ग रोधकताही महत्त्वाची : कडधान्यांच्या नैसर्गिक गुणधर्माचाही अभ्यास करावा. त्यावर येऊ शकणाऱ्या विविध प्रकारच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याची पॅकेजिंगची क्षमता तपासून पाहावी. आवश्यक असल्यास सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशिष्ट आवरणाचा वापर करावा.
क) सूक्ष्मजीवांचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असल्यास पॅकेजिंगमध्ये योग्य त्या वायूंचाही वापर करता येतो.
२) मसाल्याचे पदार्थ :
अ) मूळ अवस्थेतील मसाले पदार्थांसाठी पॅकेजिंग -
- फिल्म - उत्तम दर्जाची रोधक गुणधर्म असलेली फिल्म वापरावी.
- कडक पॅकिंग - हवाबंद असावेत.
- बाष्पविरहित असावे.
ब) भुकटी स्वरूपातील मसाले पॅकेजिंग:
मसाल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विशिष्ठ गंध किंवा सुवास. तो टिकण्यासाठी योग्य त्या प्रकारचे रोधक पॅकेजिंग घटक वापरावे लागतील. वाढत्या आर्द्रतेमुळे मसाले पदार्थावर बुरशी अथवा सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव होऊन साठवणीवर परिणाम होऊ शकतो. काही मसाले पदार्थांवर पाणी व तेलाचाही परिणाम होतो. हे रोखण्यासाठी पॅकेजिंगची योग्य रचना करावी लागेल.
३) हिरव्या भाज्या :
हिरव्या भाज्यांच्या सुपर मार्केटमधील विक्रीच्या दृष्टीने युरोपीय देशामध्ये विशेष विचार केला जातो. हिरव्या भाज्यांसाठी विशेषतः त्यांची श्वसन प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी छिद्रे असलेल्या किंवा ऑक्सिजनला आतमध्ये प्रवेश देणाऱ्या पॅकेजिंगचा विचार करावा. अशा फिल्म उपलब्ध आहेत. काही वेळेस द्विस्तरीय पॅकेजिंग आवश्यक ठरते. यासाठी आपणास हिरव्या भाज्या किती काळासाठी साठवायच्या आहेत, याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
४) कापलेल्या भाज्या:
युरोपामध्ये स्वच्छ करून, कापलेल्या भाज्यांना मोठी बाजारपेठ आहे. त्या दृष्टीने विविध भाज्यांचे एकत्रित पॅक सुपर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी ट्रेवर स्ट्रेचफिल्म किंवा पाऊच यांचा वापर केला जातो. आपल्याकडे अद्याप कापलेल्या भाज्यांची बाजारपेठ विकसित झालेली नाही. मात्र, दोघेही नोकरी करत असलेल्या शहरी जीवनशैलीमध्ये महिलांचे श्रम वाचवणारी ठरू शकते. तसेच ग्रामीण भागामध्ये महिलांना भाज्या स्वच्छ करणे व कापणे यामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
५) फळे व फळभाज्या :
फळे व फळभाज्या यांच्या पॅकिंगकरिता ट्रे व कडक बॉक्स हा पर्याय आहे. युरोपातील वातावरणामधील फळे व फळभाज्यांच्या पक्वतेच्या वेगाचा अभ्यास केला असून त्यानुसार पॅकेजिंग विकसित केले गेले आहेत. भारतातील उष्ण कटिबंधामध्ये ती आकडेवारी फारशी उपयुक्त ठरणार नाही, त्यामुळे फळे व फळभाज्यांच्या पक्वतेच्या वेगाचा अभ्यास आवश्यक आहे. या काळात त्यांना लागणारी खेळती हवा पॅकेजिंगमध्ये पुरवली गेली पाहिजे. तशी पॅकेजिंगची रचना असावी.
६) प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ :
युरोपमध्ये प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या नैसर्गिक व रासायनिक घटकांचे प्रमाण यांचा पॅकेजिंग व साठवण कालावधीमध्ये होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो. हे पदार्थ सामान्य तापमानाला, शीतगृहामध्ये किंवा गोठवण कक्षामध्ये ठेवले जाणार आहेत, त्यानुसार योग्य ती पॅकेजिंग रचना केली जाते.
सर्वसाधारणपणे अयोग्य पॅकेजिंगमुळे वाहतुकीदरम्यान मालाचे नुकसान होते. वाहतुकीदरम्यान अन्नपदार्थांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हितकारक ठरेल. स्वतःच्या उत्पादनाचा सर्वांगीण अभ्यास, आपले कोठार किंवा गोदामाची सद्यःपरिस्थिती, आपल्या वाहतुकीच्या साधनांचाही विचार नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.